जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आ.सौ. सुलभाताई खोडके आणणार स्थगन प्रस्ताव…राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आ.सौ. सुलभाताई खोडके यांची रोखठोक भूमिका

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आ.सौ. सुलभाताई खोडके आणणार स्थगन प्रस्ताव

राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आ.सौ. सुलभाताई खोडके यांची रोखठोक भूमिका
.
जुनी पेन्शन च्या प्रत्येक लढ्यात आपण कर्मचाऱ्यांसोबत-आ.सौ. सुलभाताई खोडके

MB-NEWS(मुंबई)-: एकच मिशन जुनी पेन्शन चा नारा देऊन राज्यातील जवळपास १७ लाख कर्मचाऱ्यांनी दिनांक १४ मार्च २०२३ पासून
राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या या रास्त मागणीला घेऊन तसेच या जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा घडवून आणून जुन्या पेन्शन साठी सातत्याने लढा देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अमरावतीच्या आ.सौ. सुलभाताई संजय खोडके राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्थगन प्रस्ताव आणणार आहे.
आपल्या स्थगन प्रस्तावातून आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात विश्लेषण केले आहे की , १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली. जुनी पेन्शन योजनेअंतर्गत सेवा निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला निवृत्तीवेळच्या पगाराची निम्मे रक्कम पेन्शन दिली जाते. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधना नंतर त्यांच्या पत्नीला अर्धा पगार मिळतो . एकंदरीत जुनी पेन्शन योजना ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला उतार वयात दिलासा देणारी असून त्याच्या आहार व औषधांचा निदान खर्च भागेल अशी लाभदायी आहे.
त्या तुलनेत नवीन पेन्शन अंशदायी योज़नेत फक्त ८ टक्के रक्कम मिळते. म्हणजेच निवृत्त कर्मचाऱ्यास किमान १५०० ते जास्तीत-जास्त ७ हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे. जुनी पेन्शनमध्ये नोकदाराला स्वःताच्या पगारातून रक्कम द्यावी लागत नव्हती. तर नवी पेन्शनमध्ये कर्मचाऱ्याच्या दर महिन्याच्या पगारातून १० टक्के रक्कम कपात करून आणि त्यात सरकारचा १४ टक्के वाटा मिळणार आहे. अशी ही योजना असल्याकारणाने नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजनाच लागू करण्यासाठी मागणी राज्यभरात जोर धरू लागली आहे. शासकीय नोकरीत ६० वर्षापर्यंत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याचे निवृत्ती नंतरचे आयुष्य अधिक सुलभ , सोयीचे जाण्याकरिता जुनी पेन्शन योजना लागू करणे आजची गरज असल्याचे सांगून आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संपास पाठिंबा जाहीर केला आहे.
दर दुसरीकडे निवडणुका आल्या की , जुनी पेन्शन योजना लागू करणारच ! व निवडणूका संपल्या की , यु-टर्न घेत जुनी पेन्शन योजना लागू झाल्यास राज्य दिवाळखोरीत निघेल, अश्या सरकारच्या भूमिकेवर सुद्धा आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी आपल्या स्थगन प्रस्तावातून प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी महाराष्ट्रात सर्वात जुनी आहे. पण छत्तीसगढ , राजस्थान, पंजाब मधील सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. यावरील आकडेवारीनुसार १ नोव्हेंबर २०२२-२३ सालात छत्तीसगडचा जीडीपी ४ लाख ३४ हजार कोटी होता. पंजाबचा ६ लाख २३ हजार कोटी, राजस्थानचा १३ लाख ३४ हजार कोटी आणि महाराष्ट्राचा जीडीपी तब्बल ३५ लाख ८१ हजार कोटी आहे. म्हणजे छत्तीसगड, पंजाब आणि राजस्थान या तिन्ही राज्यांचा जीडीपी जरी एकत्र केला तरी महाराष्ट्राहून जवळपास साडे ११ लाख कोटीने कमी आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू केल्यास महाराष्ट्रावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही ,असे लक्षात येते . पण सद्याच्या घडीला महाराष्ट्र वगळता छत्तीसगड , राजस्थान , पंजाब या तिन्ही राज्यांनी जुनी पेन्शन लागू केली आहे. मग महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी राज्य शासन सकारात्मक भूमिका का घेत नाही ? असा प्रश्न देखील आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी आपल्या स्थगन प्रस्तावातून अधोरेखित केला आहे.
महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना , राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना ,महसूल संघटना , लिपिक संवर्गीय संघटना अशा अनेक संघटनांनी आंदोलने केलीत . ज्यामध्ये सरकारच्या सकारात्मक आश्वासनानंतर आंदोलने स्थगित करण्यात आली . याबाबत समिती स्थापन करण्याचे सुद्धा सरकारचे म्हणणे होते . पण त्या समितीचे काय झाले, आश्वासनांची पूर्तता कधी होणार ? विलंबाची कारणे काय ? या बाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी , असा रोखठोक सवाल आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी आपल्या अधिवेशन कामकाजा दरम्यानच्या स्थगन प्रस्तावातून उपस्थित केला आहे.
तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या लढ्यात आपण शेवटपर्यंत सोबत राहणार असून प्रत्येक स्तरावर कर्मचाऱ्यांना आपली साथ लाभणार असल्याचा विश्वास देखील आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे