संगणक शास्त्र विभागात अभ्यास मंडळाची स्थापना*
MB NEWS (चांदुर रेल्वे) -राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदुर रेल्वे येथील संगणक शास्त्र विभागाच्या वतीने शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी ‘सर व्ही. राजारमण कॉम्प्युटर सायन्स सोसायटी’ चा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. वडनेरकर सर लाभले होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. एस. ए. वाणी यांची विशेष उपस्थिती होती.
कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या प्रा. वेदिका एम. सरोसरे यांनी प्रास्ताविक मांडताना अभ्यास मंडळ स्थापनेमागील मुख्य हेतू स्पष्ट केला. विद्यार्थ्यांमध्ये संगणक शास्त्र विषयाची आवड निर्माण करणे, तांत्रिक ज्ञानासोबतच व्यावहारिक कौशल्यांचा विकास करणे, तसेच विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व तंत्रज्ञानविषयक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या मंडळाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर प्रा. भाग्यश्री जी. बेलसरे यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी निवडण्यात आलेली नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये अध्यक्षपदी कु. कात्यायनी कलावटे, उपाध्यक्षपदी कु. साक्षी डांगे, सचिवपदी कु. गायत्री डहाके, खजिनदारपदी क्रिश अलोने, तर सदस्य म्हणून कु. आरती समोसे, कु. खुशी घुरडे, कु. पूर्वा कर्मोरे व अयान पठाण यांची निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा पुष्पगुच्छ व छोटी भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. एस. ए. वाणी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञानावर अवलंबून न राहता आधुनिक तंत्रज्ञानातील बदलांचा सातत्याने अभ्यास करावा, असे आवाहन केले. संगणक शास्त्र हे सतत विकसित होणारे क्षेत्र असून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत, असे मार्गदर्शन त्यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. पी. आर. वडनेरकर यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात संगणक शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानासोबतच अद्ययावत तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच केवळ परीक्षा व गुण मिळविण्यावर भर न देता विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक ज्ञान, समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशीलता, संशोधनवृत्ती आणि संवादकौशल्य विकसित करावे, असे आवाहन त्यांनी केले. अभ्यास मंडळाच्या माध्यमातून वर्षभर विविध शैक्षणिक, तांत्रिक, संशोधनात्मक व कौशल्यविकासात्मक उपक्रम प्रभावीपणे राबविले जावेत आणि त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने सक्रिय सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा सकारात्मक व सर्जनशील वापर करून स्वतःच्या उज्ज्वल करिअरसाठी प्रयत्न करावेत, असा मौलिक संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाचे आयोजनामध्ये संगणकशास्त्र विभागाच्या प्रा. भाग्यश्री बेलसरे आणि प्रा. वेदिका सरोसरे यांनी विशेष भूमिका पार पाडली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रुती वडस्कर हिने अत्यंत प्रभावीपणे केले, तर उपस्थितांचे आभार कु. खुशी घुरडे हिने मानले. या सोहळ्यास विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

