करार संपल्याने मालखेड पर्यटन स्थळ बंद
पर्यटकांचा हिरमोड ; शासनाचे लेटलतीफ धोरण
MB-NEWS (चांदुर रेल्वे) :– संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेले तालुक्यातील कृष्णाजी सागर पर्यटन स्थळावरील व्यवस्थापकांचा करार संपल्याचे कारण देत पाटबंधारे विभागाने पर्यटन स्थळाला कुलूप लावले आहे, त्यामुळे दुरून येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत असून शासनाचा ही महसूल त्यामुळे बुडत आहे.
तर दुसरीकडे कोरोना काळातील कालावधी वाढवून देण्याची मागणी व्यवस्थापक वाढवून मागत आहे. एकंदरीत शासनाच्या लेतलतीफ धोरणाचा फटका पर्यटकांना बसत आहे.
माजी आमदार प्रा वीरेंद्र जगताप यांच्या संकल्पनेतून उदयास आलेले येथील मालखेड तलावावर असलेले श्री कृष्णाजी सागर पर्यटन स्थळ संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे पर्यटकांसोबतच शालेय सहली ही सम्पूर्ण राज्यातुन या ठिकाणी येत असतात, शासनाच्या अखत्यारीत असलेले हे पर्यटन स्थळ करार पद्धतीने कंत्राटदारांना चालवण्यास दिले आहे मागील करार हा दोन वर्षांचा होता त्यात कोरोना संकटामुळे हे पर्यटन स्थळ जवळपास 1 वर्ष बंद होते तेव्हा कंत्रातदारांचे प्रचंड नुकसान झाले होते तरी सुद्धा कुठलीही नुकसान भरपाई न देण्याच्या अटीवर कंत्राटदारांना मुदत वाढ मिळाली होती, परंतु त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन लागल्याने पुन्हा 81 दिवस पर्यटन स्थळ बंद होते, त्यामुळे आता नियमित 2 वर्षाचा करार संपला असला तरी त्या 81 दिवसाची मुदतवाढ आम्हाला द्यावी या करिता कंत्राटदार पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार करीत असल्याची माहिती आहे,असे असतांना मात्र लालफित शाहीमुळे ती प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे, याचाच परीणाम म्हणून गेलेल्या 17 जानेवारी रोजी पाटबंधारे विभागाने पर्यटनाला कुलूप लावले आहे, यामुळे या पर्यटनावर काम करणाऱ्या कर्मचारी यांचा रोजगार थांबला असून दुरून येणाऱ्या पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आम्ही मागील दोन वर्षकरिता पर्यटनाचा करार केला होता मध्यंतरी कोरोना लोकडाऊन मुळे पहिले एक वर्ष तर नंतर 3 महिने पर्यटन स्थळ बंद होते, एक वर्षाचा कालावधी वाढून मिळाला त्याच प्रमाणे 3 महिन्यांचा कालावधी ही वाढवून मिळावा यासाठी आमचा पत्रव्यहार गेल्या महिनाभरापासून सुरू आहे, तरी सुद्धा शासनाच्या कर्मचाऱ्यांनी पर्यटन स्थळ बंद केले आहे तेव्हा दुरून येणाऱ्या पर्यटकांनी खात्री करून पर्यटनाला यावे असे आवाहन कंत्राटदार गजानन खंडार यांनी केले आहे.

