रेटून खोट बोलणाऱ्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे विकास ठप्प.आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांचे सरकारवर टिकास्त्र
MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र)तिवसा :- राज्यातील सध्याच्या रेटून खोट बोलणाऱ्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे संपूर्ण विकास कामे ठप्प झाली आहेत. दरदिवशी निघणारे असंख्य शासन निर्णय व केवळ घोषणा करुन सरकार राज्यातील विकासकामे जलदगतिने होत असल्याचा आभास निर्माण करीत असल्याचे टिकास्त्र आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सरकारवर डागले. तळेगांव ठाकूर ता. तिवसा इथं नुकत्याच पार पडलेल्या पांधन रस्त्याच्या भुमिपुजन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर सरपंच दर्शना मारबदे तिवसा पं.स.च्या सभापती कल्पना दिवे, उपसभापती रोशनी पुनसे, बाजारसमितीचे सभापती रवि राऊत, तिवसा नगरपंचायतचे अध्यक्ष योगेश वानखडे, तिवसा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतिश पारधी, भैय्यासाहेब ठाकूर, अण्णासाहेब दिवे, संजय ठाकुर, हरीभाऊ मते, प्रल्हाद माहतुरे, विठठल मस्की, श्रीकृष्ण तिजारे, माजी सभापती दिलीप काळबांडे, प्रकाश माहुरे, माजी उपसभापती लुकेश केने, दिलीप वानखडे, किशोर दिवे, प्रफुल देशमुख, शेतु देशमुख, रितेश पांडव, कामगार सेलचे अध्यक्ष पंकज देशमुख, अनिकेत बादशे, मुकुंद पुनसे, अमोल पन्नासे.
आमदार ॲड. यशोमती ठाकूर सरकारवर टिका करतांना पुढं बोलतांना म्हणाल्या की, हे सरकार अतिशय बेजबाबदार आहे, फक्त राज्यात सर्वत्र वसूली सुरु आहे. विकास निधी वाटप करण्यात मोठा पक्षपात होत असून विरोधी पक्षाच्या आमदारांना सातत्याने सापत्न वागणूक मिळते. पालकमंत्री सुद्धा निधी वाटपात राजकारण करतात, असा आरोप करुन त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात जी विकासकामे झालीत ती विकासकामे याच सरकारने केलीत. अशी बोंबाबोंब करुन विकासकामांचे श्रेय लाटण्याचा एककलमी कार्यक्रम या सरकारने राबविला आहे. आपण मात्र या भांडगळीत पडणार नाही. मी सातत्याने पाठपुरावा करुन विकासकामांकरिता निधी खेचून आणला आहे. फुकटचे श्रेय लाटण्याची आमची मानसिकता नाही. जे जमत नाही ते स्पष्टपणे सांगण व जे होवू शकतं त्यासाठी वाट्टेल तसे परिश्रम घेण्याची माझी पद्धत आहे. सत्तेच्या लालसेपोटी काही नेते पाठीत खंजीर खुपसून मंत्री म्हणून वावरत आहे. निष्टा आणि जनतेशी बांधिलकी याचा त्यांच्याशी दुरदुरपर्यंत संबंध नाही. अस सांगून त्या म्हणाल्या की, तुम्ही कितीही राजकारण करा आम्ही मात्र तुम्हाला पुरुन उरणार, कारण पवित्र संविधानावर आमचा विश्वास आहे. मात्र हेच पवित्र संविधान तोडफोड करण्याचं महापातक केल्या जातंय. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील. हा केवळ निवडणूक जुमला होता. अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

