सरकारच्या समन्वयाचा अभावामुळेच शाळाबाह्य मुलांचा प्रश्न गंभीर ॲड यशोमती ठाकूर यांचा विधानसभेत घणाघाती आरोप

सरकारच्या समन्वयाचा अभावामुळेच शाळाबाह्य मुलांचा प्रश्न गंभीर,ॲड यशोमती ठाकूर यांचा विधानसभेत घणाघाती आरोप

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र)नागपूर:-राज्यामध्ये विशेषत: विदर्भामध्ये शाळाबाह्य मुलांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. तसेच स्थलांतरित मुलांच्या प्रश्नानेही गंभीर रूप धारण केले आहे. मात्र, याला राज्य सरकारच्या विविध खात्यांमधील समन्वयाचा अभाव कारणीभूत असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सरकारला विधानसभेत चांगलेच धारेवर धरले.

राज्यातील शाळाबाह्य मुलांच्या आणि स्थलांतरित मुलांच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. शेकडो विद्यार्थी हे वीटभट्ट्यांवर काम करताना दिसत आहेत, तर कित्येक विद्यार्थी भीक मागताना दिसत आहेत मात्र त्याचे या सरकारला अजिबात गांभीर्य नाही. शाळाबाह्य मुलांच्या या निर्माण झालेल्या प्रश्नाला राज्य सरकारच्या नगर विकास विभाग, महिला बालविकास विभाग आणि शालेय शिक्षण या तीन विभागांमध्ये समन्वय नसल्यामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचा गंभीर आरोप एडवोकेट ठाकूर यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला.
तसेच विदर्भातील मेळघाटातील स्थलांतरित विद्यार्थ्यांसाठी एक विशेष ॲप आपण महिला आणि बालविकास मंत्री असताना तयार केले होते. या ॲपचे पुढे काय झाले? या ॲपचा वापर सरकार का करत नाही. स्थलांतरित मुलांसाठी विशेष तयार करण्यात आलेले हे ॲप सरकार केव्हा कार्यान्वित करणार आहे असा सवाल यावेळी ठाकूर यांनी उपस्थित केला. राज्य सरकार शाळाबाह्य आणि स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही, हेच यावरून दिसून येते. त्यामुळे सरकारने शाळाबाह्य मुलांसाठी आवश्यक असलेल्या नगर विकास विभाग शालेय शिक्षण विभाग आणि महिला बालविकास विभाग या तीन विभागांमध्ये कधी समन्वय साधणार याचे उत्तर द्यावे. असे ॲड. ठाकूर म्हणाल्या.तसेच सरकार सातत्याने शिक्षक शिक्षकांची कमतरता नाही ,असे सांगत आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये शिक्षकांची वाणवा आहे . सरकार शिक्षक भरती कधी करणार आहे, हे एकदा स्पष्ट करावे. सरकारने विशेष शाळा सुरू केल्याचा दावा केला आहे. मात्र ,अशा शाळा सुरू नसल्याचे निदर्शनास येत आहे. सरकार शाळाबाह्य मुले आणि स्थलांतरित विद्यार्थी यांच्यासाठी गांभीर्याने कधी लक्ष देणार? असा सवाल करीत ठाकूर यांनी सरकारला खडे बोल सुनावले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे