जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारला निवडणुका घ्यायला वेळ नाही,ॲड. यशोमती ठाकूर यांचा विधानसभेत सरकारवर हल्लाबोल
MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र):-नागपूर राज्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहे, नदीवर साकव नसल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. सरकार त्याकडे लक्ष देत नाही आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आवश्यक असताना निवडणुकाही घेत नाही, जनतेच्या प्रश्नासाठी या सरकारकडे कुठलेच धोरण नाही अशा शब्दात काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज विधानसभेत सरकारवर हल्ला चढवला. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान त्या बोलत होत्या.
विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील सावडाव – नेरले आणि मिळदे- हातगे या गावादरम्यान. साखर आवश्यक असून जिल्हा नियोजन समिती मधून हे साकव पूर्ण करावेत अशी मागणी, आमदार राजन साळवी यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दरम्यान केली. यावर उत्तर देताना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी एका साकवासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च येतो. वास्तविक जिल्हा नियोजन समिती मधून एका साठवासाठी एवढी रक्कम खर्च करता येत नाही. जास्तीत जास्त 50 लाख रुपयांचा निधी एका साकवासाठी दिला जातो. त्यामुळे हे साकव बांधण्यासाठी वेगळ्या हेड खाली तरतूद करावी लागणार आहे, एकूणच राज्यातील साकवांसाठी तेराशे कोटी रुपये लागणार आहेत त्याबाबत सरकार विचार करीत असल्याचे उत्तर दिले. मंत्री चव्हाण यांच्या या उत्तराने समाधान न झालेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सरकारला जनतेच्या प्रश्नांमध्ये कुठलेही स्वारस्य दिसत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातल्या या दोन साकवांच्या अभावी जनता जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहे. परिणामी साकव नसल्याने जनतेला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असून त्यांना अतिशय दूरवरून प्रवास करावा लागत आहे. मात्र, हे सरकार निष्क्रिय असून सरकारने राज्यातील साकवाबाबत निश्चित धोरण ठरवले पाहिजे. सरकारला जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्यायच्या नाही, लोकप्रतिनिधींनी कारभार करावा असे सरकारला वाटत नाही आणि दुसरीकडे सरकार स्वतःही निष्क्रिय आहे कुठलेही धोरण ठरवत नाही ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची घनाघाती ठिकाणी ॲड. ठाकूर यांनी यावेळी केली.

