- चांदुर शहरात महर्षी सुदर्शन जयंती उत्साहात साजरी
MB NEWS (चांदुर रेल्वे )५ नोव्हेंबर २०२५ रोजी नगर परिषद कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात महर्षी सुदर्शन यांच्या प्रतिमेस हार अर्पण व पूजन करून करण्यात आली. या प्रसंगी नगर परिषद कर्मचारीवर्गासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.तसेच गुरुनानक जयंती निमित्त समाजबंधूंनी सिंधी कॉलनी येथील गुरुद्वारामध्ये उपस्थित राहून गुरुनानक देव जी यांच्या पवित्र प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गुरुनानक देव जींच्या दया, करुणा, बंधुभाव आणि समानतेच्या शिकवणींना वंदन करून मानवतेचा आणि शांततेचा संदेश समाजात पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
महर्षी सुदर्शन जयंतीनिमित्त शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक पोशाख, फेटे आणि सजवलेला रथ यातून महर्षी सुदर्शन यांच्या प्रतिमेची शोभायात्रा शहरभर निघाली. रॅलीदरम्यान नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी रस्त्यावर येऊन महर्षी सुदर्शन यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन करत होते. ढोल-ताशे, डीजे आणि आकर्षक सजावट यामुळे संपूर्ण शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.
रॅलीच्या मार्गक्रमणादरम्यान सिनेमा चौक येथील चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळ्यास सुदर्शन समाजबंधूंनी हार अर्पण करून अभिवादन केले. तसेच नगर परिषद परिसरात स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सुद्धा पुष्पहार अर्पण करून समाजातर्फे अभिवादन करण्यात आले.
रॅलीनंतर सुदर्शन समाज भवन, गोदावरी नगर येथे दीपप्रज्वलन करून पूजनाचा कार्यक्रम पार पडला. समाजातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते पूजन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या शेवटी समाजबंधूंनी मनोगते व्यक्त करून समाजजागृतीसाठी योगदान देण्याचा संकल्प पुन्हा दृढ केला.
या प्रसंगी श्री जितेंद्र न. कर्से यांना वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल सुदर्शन समाजातर्फे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यांनी आतापर्यंत समाजासाठी केलेले निस्वार्थ कार्य, समाजाच्या प्रत्येक उपक्रमात दाखवलेली तत्परता आणि सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याचे प्रयत्न या सर्व गोष्टींचा गौरव करत त्यांचा विशिष्ट सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी श्री जितेंद्र करसे यांनी आपल्या भावनिक शब्दांत सर्व समाजबंधूंचे आभार मानत म्हटले की,
> “आपण दाखवलेला स्नेह, विश्वास आणि सन्मान ही माझ्या कार्याची खरी प्रेरणा आहे. सुदर्शन समाजाच्या उन्नतीसाठी प्रत्येक क्षण समर्पित ठेवण्याचा मी संकल्प पुन्हा दृढ करतो.”
तसेच श्री तेजस भरत इमले या आयटीआय येथे कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती मिळाल्याबद्दल सुदर्शन समाजातर्फे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित समाजबंधूंनी महाप्रसादाचा लाभ घेतला. धामणगावसह शहरातील अनेक सुदर्शन समाजबंधूंची विशेष उपस्थिती लाभली.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व समाजबंधूंचे एकत्रित प्रयत्न आणि सहकार्य लाभले.

