लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी!
पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवी
MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र)-चांदूर रेल्वे शहर व तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पत्रकार निशिकांत कदम (देशमुख) यांचे सुपुत्र अभिनव निशिकांत कदम देशमुख यांनी लंडन येथे उच्च शिक्षण घेत सायबर सिक्युरिटी आणि अप्लाइड डेटा सायन्स या आधुनिक व अत्यंत महत्त्वपूर्ण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.अभिनव कदम देशमुख यांनी रॉयल हॉलोवे, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथून Applied Data Science and Cyber Security या विषयात Master of Science (MSc) पदवी गुणवत्तेसह (Merit) प्राप्त केली आहे. जागतिक स्तरावर वेगाने विस्तारत असलेल्या सायबर सिक्युरिटी क्षेत्रात त्यांनी मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात आहे.
१४ डिसेंबर २०२६ रोजी लंडन येथे पदवीदान सोहळा पार पडणार असून, या सोहळ्यात अभिनव यांना त्यांच्या शैक्षणिक यशाची अधिकृत पदवी प्रदान केली जाणार आहे.
अभिनव यांच्या या यशामुळे केवळ देशमुख कुटुंबियांचेच नव्हे, तर चांदूर रेल्वे तालुक्याचेही नाव आंतरराष्ट्रीय शैक्षणिक पटलावर उजळले आहे. सातत्यपूर्ण मेहनत, आधुनिक तंत्रज्ञानातील आवड आणि उच्च शिक्षणाची जिद्द यामुळे त्यांनी हे यश संपादन केले आहे.
सायबर सुरक्षेसारख्या भविष्यातील दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात गुणवत्तेसह पदव्युत्तर पदवी मिळवल्याबद्दल अभिनव कदम देशमुख यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनव कदम देशमुख आणि देशमुख परिवाराचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.चांदूर रेल्वेच्या मातीतील तरुणाने लंडनच्या भूमीवर मिळवलेले हे यश नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

