विवेक राऊत यांचे नवोपक्रम विभागातून प्रथम
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे आयोजन ; राज्यस्तरावर झाली निवड
MB-NEWS (चांदुर रेल्वे) :- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या नवनवीन कल्पना वापरून त्याला मूर्त स्वरूप देणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांना व अधिकाऱ्यांसाठी शासनाच्या वतीने नवोपक्रम स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येतात त्याच स्पर्धेत येथील पंचायत समिती येथील शिक्षण विभागात कार्यरत विषय साधन व्यक्ती विवेक राऊत यांच्या नवोपक्रमाला विभागातुन प्रथम क्रमांक मिळाला आहे.
राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्याथ्र्यांच्या शिक्षणासाठी सतत प्रयत्न करीत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनांना व सृजनशील विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेणाऱ्या सर्व स्तरावरील शिक्षक व अधिकारी यांच्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येतात. त्यानुसार यावर्षी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा विभागस्तरावर प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावती मार्फत आयोजित करण्यात आलेली होती. स्पर्धेसाठी प्रथम व द्वितीय फेरीचे मूल्यमापन करून गुणानुक्रमे गट क्रमांक ४ विषय सहाय्यक, विषय साधनव्यक्ती, समावेशित साधनव्यक्ती विशेष साधनव्यक्ती विशेष शिक्षक व ग्रंथपाल या गटातून गुणवत्ताप्राप्त स्पर्धकांची नावे जाहीर करण्यात आले त्यात स्थानिक गटसाधन केंद्र येथे कार्यरत विवेक राऊत यांच्या नाट्यभिनयातून मिळाले अभिव्यक्तीचे बळ या नवोपक्रमाला प्रथम क्रमांक मिळाला आहे सोबतच राज्यस्तरावर त्यांच्या या उपक्रमाची निवड करण्यात आली आहे. यासाठी डायट चे प्राचार्य मिलिंद कुबडे व गटशिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर यांच्या मार्गदर्शनात डायटचे सर्व अधिव्याख्याते, गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले असल्याचे विवेक राऊत यांनी सांगितले..
▪️काय आहे नवोपक्रम
विवेक राऊत यांनी मागील वर्षी झालेल्या दिव्यांग बालराज्य नाट्य स्पर्धेत तालुक्यातील जिल्ह्य परिषद शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना घेऊन बालनाट्य सादरीकरण केले होते त्यात त्या बालनाट्याला बक्षीसही मिळाले होते त्याच नाटकाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी हा उपक्रम पूरक ठरला होता त्याच उपक्रमाची राज्यस्तरावर निवड झाली आहे.

