नांदगावच्या स्वच्छता व आरोग्य सभापतींनी सौ.ज्योत्सना अमोल धवसे यांनी केली डंपिंग ग्राउंडची तातडीची पाहणीकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश;कायमस्वरूपी जागेचा प्रश्न निकाली काढणार

नांदगावच्या स्वच्छता व आरोग्य सभापतींनी सौ.ज्योत्सना अमोल धवसे यांनी केली डंपिंग ग्राउंडची तातडीची पाहणीकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश;कायमस्वरूपी जागेचा प्रश्न निकाली काढणार

MB NEWS (नांदगाव खंडेश्वर)तालुका प्रतिनिधी –नांदगाव खंडेश्वर येथील नगरपंचायतीच्या नवनियुक्त स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. ज्योत्स्ना अमोल धवसे यांनी पदभार स्वीकारताच शहरातील नागरिकांच्या स्वच्छतेसंदर्भातील गंभीर समस्यांची दखल घेत डंपिंग ग्राउंडची तातडीने पाहणी केली. यावेळी त्यांनी डंपिंग ग्राउंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने व तात्काळ विल्हेवाट लावण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.डंपिंग ग्राउंडच्या आजूबाजूला वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दुर्गंधी,आरोग्यविषयक त्रास अथवा कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी स्वच्छता विभागाने घ्यावी,असे निर्देश देताना सभापतींनी कचरा व्यवस्थापनात कसूर सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला. याठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करणारी मशीन अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने ती तातडीने दुरुस्त करून सुरू करण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश देण्यात आले.

नगरपंचायतीकडून गेल्या अनेक वर्षांपासून डंपिंग ग्राउंडच्या कायमस्वरूपी जागेचा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आला असून,हा प्रश्न आता अधिक काळ रेंगाळू दिला जाणार नाही.सदर प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन यावेळी स्वच्छता व आरोग्य सभापती सौ.ज्योत्स्ना अमोल धवसे यांनी दिले.
याशिवाय नांदगाव खंडेश्वर शहरातील प्रत्येक प्रभागात दररोज नियमित साफसफाई करण्यात यावी आणि येत्या महाशिवरात्री महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरापासून चांदूर रेल्वे रोडलगत साचलेले सर्व शेणखत तात्काळ उचलण्यात यावे, परिसरातील झाडेझुडपे तोडून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात यावा तसेच बसस्थानक परिसरात दररोज विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
शहराच्या कोणत्याही भागात कचरा दिसू नये यासाठी सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी दररोज सफाई कर्मचाऱ्यांकडून अहवाल घेऊन तो थेट सभापतींकडे सादर करावा, असे स्पष्ट निर्देशही यावेळी देण्यात आले.सभापती सौ. ज्योत्स्ना अमोल धवसे यांच्या या तातडीच्या पाहणीमुळे आणि ठोस निर्देशांमुळे नांदगाव शहरातील स्वच्छता व्यवस्थेत लवकरच सकारात्मक बदल घडून येतील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे