माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडे
MB NEWS (मोझरी )अमरावती :महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि पारंपरिक वारशाचे प्रतीक असलेल्या महालक्ष्मी अर्थात गौरी मातेचे आगमन आणि पूजनाचा सोहळा मोझरी येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. माजी मंत्री तथा काँग्रेस नेत्या ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी येथील निवासस्थानी दरवर्षीच्या परंपरेनुसार महालक्ष्मी मातेची विधिवत प्रतिष्ठापना व महापूजा करण्यात आली.
या मंगलप्रसंगी अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंतराव वानखडे आणि ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मातोश्री पुष्पमाला ठाकूर यांच्या हस्ते गौरी मातेची प्रतिष्ठापना व पूजन करण्यात आले. यावेळी ठाकूर कुटुंबीयांसह काका राजीव ठाकूर, सुपुत्र यशवर्धन, आकांक्षा तसेच मोझरी व परिसरातील नागरिक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक गीते, मंगलमय वातावरण आणि भक्तिभावाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
जनतेच्या सुख-समृद्धीसाठी मातेचरणी प्रार्थना :-या पूजन सोहळ्यात शेतकरी, कष्टकरी, मजूर, तरुण, महिला आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख-समृद्धीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. बळीराजाच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, शेतकरी संकटमुक्त व्हावा, तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात सुख, समाधान व समृद्धी नांदावी, यासाठी महालक्ष्मी मातेचरणी साकडे घालण्यात आले.
“हे माता महालक्ष्मी! आमच्या राज्यातील बळीराजा संकटात आहे, त्याला धीर दे आणि त्याच्या कष्टाला योग्य दाम मिळू दे. राज्यातील सर्वसामान्य जनता, माता-भगिनी आणि तरुणांच्या जीवनातील अडचणी दूर करण्याचे बळ दे. प्रत्येक घरात सुख-समाधान नांदू दे, कुणाच्याही घरात भुकेची किंवा बेरोजगारीची चिंता राहू देऊ नकोस. शेतकरी, कष्टकरी, मजूर आणि सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य कायम फुलत राहू दे. महाराष्ट्र सुजलाम्-सुफलाम् होऊ दे, हीच तुझ्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना!”
यावेळी खासदार बळवंतराव वानखडे यांनीही महालक्ष्मी मातेचे दर्शन घेऊन अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.महालक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने ठाकूर कुटुंबीय, आप्तेष्ट, नागरिक आणि महिला भगिनींच्या उपस्थितीने मोझरी परिसरात दिवसभर भक्तिमय आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळाले. पारंपरिक श्रद्धा, संस्कृती, कौटुंबिक जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम या पूजन सोहळ्यात अनुभवायला मिळाला.

