मालमत्ता करवाढ रद्द होऊनही अतिरिक्त कराची आकारणी का ?
माजी नगरसेवक प्रशांत डवरे यांचे मनपा आयुक्तांना निवेदन,अमरावती मनपा आयुक्तांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी…
MB-NEWS (अमरावती) – : मनपाने सरसकट मालमत्ता करा मध्ये दुपट्टीने व काही भागात त्यापेक्षाही जास्त कर वाढ केली होती . या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहर च्या वतीने गेल्या ०४ ऑक्टोबर २०२२ रोजी महापालिकेवर मोठे आंदोलन करून वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी केली होती . दरम्यान राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गेल्या ७ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अमरावती महानगर पालिकेच्या वतीने केलेल्या मालमत्ता कर वाढीला स्थगिती दिली होती. त्यामुळे अमरावतीकर सामान्य नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला होता . परंतु आता पुन्हा शहराच्या काही भागात मालमत्ता कर भरण्यासंदर्भात नोटीस बजावली जात आहे. तसेच वाढीव दरानेच म्हणजेच दुपट्टीने मालमत्ता कराची आकारणी केलेले बिल दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून मनपाच्या या कामकाजाला घेऊन प्रश्न उपस्थित होत आहे. उपमुख्यमंत्र्यांनी वाढीव मालमत्ता कराला स्थगिती देण्याचे आदेशित केले असतांना सुद्धा नागरिकांना अतिरिक्त मालमत्ता कराची आकारणी का होत आहे ? याबाबत महानगर पालिकेने स्पष्टीकरण द्यावे , या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत डवरे यांनी मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना सादर केले . निवेदन देते वेळी माजी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत यांच्यासह कार्यकर्ते व मालमत्ता कर धारक उपस्थित होते .

