राज्यात लवकरच तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी ..!!
▪️ नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात लवकरच तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची पदभरती करण्यासाठी महसूल विभागाच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, याबाबतचा आदेश जारी केला आहे.
▪️मागील अनेक वर्षांपासून राज्यात तलाठी भरती झालेली नाहीये. ठाकरे सरकारने तलाठी भरतीची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्याने हा विषय मागे पडला होता. आता पुन्हा तलाठी भरतीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
▪️ महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाने 2014 मध्ये नवीन तलाठी सज्जा व मंडळ अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली होती. ती प्रत्यक्षात येण्यासाठी आठ वर्षे गेली. म्हणजेच ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ हा अनुभव खुद्द तलाठ्यांनाही आला. नाशिक महसूल विभागात सर्वाधिक 689 सज्जा आणि 115 मंडळे स्थापन होणार आहेत.
▪️एवढ्या जागांसाठी होणार भरती?
राज्यात तलाठ्यांच्या 3110 पदांसाठी, तर मंडळ अधिकाऱ्यांच्या 511 पदांसाठी भरती होणार आहे. डिसेंबरअखेर किंवा जानेवारी महिन्यात या भरतीबाबतची जाहिरात निघण्याची शक्यता असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

