योग्य व्यक्तीलाच करा गावाचा कारभारी,
गावागावात उमटतो सूर ; ग्रामपंचायत निवडणूकीला येऊ लागली रंगत
MB-NEWS (पवन ठाकरे नांदगाव ( खंडेश्वर)) : अवघ्या एका दिवसांवर असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकला घेऊन गावागावांतील स्थानिक व पक्षीय राजकारणाला अधिकच पेव फुटले आहे. ७ डिसेंबरला उमेदवारी मागे घेणे व निवडणूक चिन्ह घेणे या प्रशासकीय प्रक्रिया झाल्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंगत येऊ घातली आहे. त्यामुळे योग्य व कार्यक्षम व्यक्तीलाच गावाचा कारभारी करा, असा सूर गावागावांत उमटत आहे.
१८ डिसेंबरला होत असलेल्या निवडणुकीत थेट जनतेमधून सरपंच निवडायचा असल्याने आपल्याच गटाचा सरपंच व सदस्य निवडून यावेत यासाठी गावागावांत असलेले राजकीय व स्थानिक गट प्रयत्नशील आहे. असले तरी निवडून येणाऱ्या उमेदवारांनी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या ग्रामविकासाच्या योजना ग्रामस्तरावर राबवून गाव विकासाचे ध्येय ठेवल्यास आदर्श गावांची संकल्पना पूर्ण होऊ शकते. याकडे कटाक्षाने गावपुढाऱ्यांनी लक्ष देणे श्रेयकर आहे. प्रचारादरम्यान एकमेकांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांचे उणेदुणे काढून गावात निवडणुकीचा ताप वाढविण्यापेक्षा गटातटाकडे न पाहता सुज्ञ मतदारांनी योग्य उमेदवारांना निवडून द्यावे, असा सूर गावकऱ्यांमध्ये उमटत आहे. प्रत्येक गावातील नागरिकांना रस्ते, वीज, पाणी, शिक्षण व आरोग्य आदी समस्या भेडसावत असताना त्याकडे दुर्लक्ष करणे ही गोष्ट विकास कामात बाधा आणणारी असते.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
चौकाचौकात रंगताहेत निवडणुकीच्या गप्पा :-आता चौकात, बैठकीच्या जागी, पुढाऱ्यांच्या घरी निवडणुकीबाबत आखाडे बांधण्यात येत आहेत. जसजसी निवडणुकीची तारीख जवळ येईल, तसेतसे ऐकावयास मिळणार आहे. पोस्टर, वॅनर्स, शिकवणूक पत्रिका प्रचारार्थ असल्या तरी प्रचारात डिजिटल क्रांतीचा समावेश होत असल्याने जवळ-जवळ प्रत्येकाजवळ असलेल्या भ्रमणध्वनीवर मलाच मते द्या, असा संदेश येत आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

