पदवीधर निवडणूक : ‘अशा’ उमेदवारांना मतदान करून उपयोग काय? पदवीधर निवडणुकीच्या मूळ संकल्पनेस हरताळ !

पदवीधर निवडणूक : ‘अशा’ उमेदवारांना मतदान करून उपयोग काय? पदवीधर निवडणुकीच्या मूळ संकल्पनेस हरताळ !

पदवीधरांच्या समस्या जैसे थे…पदवीधर आमदार ६ वर्षात क्वचितच आढळले मतदारसंघात

MB-NEWS (अमरावती):– प्रारंभीच्या काही वर्षांत अराजकीय व्यक्ती पदवीधर आमदार व्हायचे. गेल्या काही निवडणुकांपासून मात्र थेट राजकीय पक्षच यात उतरले असून ज्या उद्देशाने पदवीधर मतदारसंघ निर्माण करण्यात आले, त्या मूळ उद्देशालाच सध्या हरताळ फासलेला दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पदवी मिळूनही चाकरी न मिळणे, तसेच अनेक समस्या आहेत तशाच दिसून येत आहेत. सर्वच राजकीय पक्ष या मतदारसंघातून तज्ज्ञ, विचारवंत, अभ्यासू उमेदवार कसे जातील, यापेक्षा पक्षीय विचारसरणीचा उमेदवार तिथे कसा जाईल, याकडेच पहात आहेत. त्यामुळे अशा विचारसरणीच्या उमेदवारांना मतदान करून उपयोग काय ? असा सवाल चांदूर रेल्वे तालुक्यातील पदवीधर मतदार विचारत आहे. यात विशेष म्हणजे अमरावती विभागातील पदवीधर आमदार ६ वर्षात केवळ १ -२ वेळाच धामणगाव मतदारसंघात आढळल्याचे मतदारांचे म्हणणे असुन पदवीधरांच्या समस्या “जैसे थे” आहेत.

अमरावती विभागात पदवीधर मतदारसंघाची निवडणुक जाहीर झाली आहेत.गेल्या काही वर्षांत पदवीधर आमदार उच्च शिक्षणातील महत्त्वाच्या घटकांच्या समस्यांचे महत्त्व पटवून देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे अशा उमेदवारांना मतदान करून उपयोग काय ? असा प्रश्न मतदार विचारत आहे. सुशिक्षित पदवीधारकांना योग्य प्रतिनिधीत्व विधिमंडळात मिळावे, या हेतूने पदवीधर निवडणुका होतात. मात्र कुठलेही ठोस कार्य सदर निवडून गेलेला प्रतिनिधी करीत नसल्यामुळे मतदारांची घोर निराशा होत आहे. निवडणुका लागण्याच्या अगोदर दोन महिने मुंबईचे दौरे करायचे, फोटो काढायचे, निवेदन दिल्याचा आव आणायचा आणि पदवीधर मतदारांना गोंजारण्याचा केविलवाणा प्रयत्न कशासाठी ? असा सवाल उपस्थित झाला आहे. आयटीआयच्या तासिका निदेशकांचे प्रश्न कायम आहे. याकरिता विद्यमान आमदार, इच्छूक उमेदवारांकडे पाठपुरावा केला; मात्र त्याचा कुठलाही फायदा झाला नाही. जास्तीत जास्त तासिका निदेशक हे पदवीधर मतदार संघाचे मतदार असुन यंदा निराशा करणाऱ्या उमेदवारांना धडा शिकविण्याचा इशारा आयटीआय निदेशक वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य ने दिला आहे. याशिवाय अनेक पदवीधर शिक्षकांच्या सुद्धा समस्या कायम आहे. याशिवाय बरेच पदवीधर हे बेरोजगार असून त्यांच्या रोजगाराच्या दृष्टीने पदवीधर लोकप्रतिनिधींनी कुठलेही ठोस कार्य केलेले नाही. एकूणच म्हणजे पदवीधर लोकप्रतिनिधींना ज्या उद्देशाने निवडून देतात त्या उद्देशालाच हरताळ फासल्या जात असून यामुळे यंदा पदवीधर मतदार हा जागृत झालेला आहे. त्यामुळे कामे न करणाऱ्या उमेदवारांना यंदा सदर निवडणुकीत फटका बसणार असल्याची चिन्हे दिसत आहे.

आमच्या तासिका निदेशकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष – टी. बी. टांगले

मी अभियांत्रिकी पदवीधर असून आयटीआयमध्ये तासिका निदेशक म्हणून कार्यरत आहो. आम्हाला कुठलीही जॉब सिक्युरिटी नसून अनेक वर्ष काम केल्यानंतरही आमचे अनेक तासिका बांधव हे दरवर्षी बेरोजगार होत आहे. यासंबंधी आम्ही पदवीधर आमदारांकडे पाठपुरावा केला होता, परंतु त्यांनी कुठलीही यामध्ये ठोस भूमिका निभवली नाही. त्यामुळे या पदवीधर आमदारांची गरज काय आहे ? असा प्रश्न मला पडलेला आहे.
टी. बी. टांगले
तासिका निदेशक

पदवीधरांच्या समस्या सोडविण्यास लोकप्रतिनीधी अपयशी – प्रभाकर अर्जापूरे

प्रा. बी. टी. देशमुख (कॉंग्रेस) १९८० ते २०१० पर्यंत ३० वर्षे व २०१० ते २०२३ दोन टर्म डॉ. रणजीत पाटील (भाजपा) या दोन्ही पदवीधर आमदारांनी अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातील पदवीधरांच्या प्रश्नांवर राजकारण केले. त्यामुळे पदवीधर आमदार कशासाठी ? पदवीधरांच्या पसंतीक्रम मतदानातून निवडून जाणारे पदवीधरांचे नेतृत्व शपथ घेवून सत्तेत राहून ही पदवीधरांच्या समस्या सोडविण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे आम्ही पदवीधर मतदार “नोटा” बटनाचा प्रयोग करणार आहो. अकार्यक्षम पदवीधर आमदार जनतेच्या तिजोरीवर का पोसावेत ?

प्रभाकर अर्जापूरे
उपेक्षित अंशकालीन पदवीधर, अमरावती पदवीधर मतदारसंघ

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे