खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ देऊ नका – आ प्रताप अडसड यांचे निर्देश
तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक
MB-NEWS(अतुल शर्मा )धामणगाव रेल्वे:-सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणून आजही कृषी क्षेत्राचा नावलौकिक आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात उद्योग आणि सेवा क्षेत्र वाढले असले तरी कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नाही. खरीप हंगामाला आता सुरुवात होत आहे. अतिशय महत्त्वाचे असलेल्या या हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आमदार प्रताप अडसड यांनी यंत्रणेला दिले.
येथील गिरधारीलालजी द्वारकादाची पसारी धर्मशाळेत कृषी विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी राजेश वालदे, संत शंकर महाराज कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी यु पाटील प स सदस्य राजकुमार केला उपस्थित होते
खरीप हंगामाला आता काही दिवसातच सुरवात होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बियाणांची टंचाई होऊ देऊ नका, असे सांगून आ अडसड म्हणाले, नकली बियाणे लावले तर शेतकऱ्याचे संपूर्ण वर्ष वाया जाते. तालुक्यात नकली बियाणांची आवक, वाहतूक व विक्री होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणेने सजग राहावे. केवळ एक खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक घेतली म्हणजे प्रश्न सुटतात, असे समजू नका. तर वारंवार निर्माण होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागाने समन्वयाने काम करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. कृषी सहाय्यकानी आपल्या गाव स्तरावर नियोजन करणे गरजेचे आहे पिक विम्याचा पुढील काळात शासन हप्ता भरणार आहे त्यामुळे या पिक विम्या पासून शेतकरी वंचित राहणार नाही याची दखल कृषी विभागाने घेणे गरजेचे आहे
आपल्या विभागाप्रती शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होणार नाही, याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी. या आढावा बैठकीत आ अडसड यांनी प्रथम अनुभवी शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेतले यात मोहन इंगळे, प्रतीक ब्राह्मणकर, अनिल बोरकर, निरंजन रोंघे यासह अनेक शेतकऱ्यांनी या हंगामात काय नियोजन करायचे याविषयी मत मांडले तालुक्यात सोयाबीन, कपाशी, तुर ही पिके घेताना किती बियाणे उपलब्ध आहे यात खते औषधी याविषयी आढाव्याचे सादरीकरण तालुका कृषी अधिकारी राजेश् वालदे यांनी केले प्रास्ताविक व संचालन प स चे कृषी विस्तार अधिकारी ढोमणे यांनी केले

