विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबत त्यांचा शारीरिक विकासही महत्त्वाचा -सुधीर केने
फरशी स्टॉप चौकात मलखांब दिवस साजरा ; विद्यार्थ्यांकडून नेत्र दीपक प्रात्याक्षिक सादर
MB-NEWS (रवि कलाने) अमरावती, :- आई वडील हे विद्यार्थ्यांच्या फक्त बौद्धिक विकासाकडेच लक्ष देतात परंतु संभाव्य परिस्थिती लक्षात घेता सोशल मीडियाचे वाढलेले प्रस्थ व त्यापासून विविध व्याधींनी विद्यार्थी त्रस्त होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास महत्त्वाचा आहे, त्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच खेळाकडेही वळवावे असे आवाहन माहिती अधिकार कायद्याचे तज्ञ तथा पत्रकार सुधीर केने यांनी केले.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व जिल्हा मलखांब संघटना यांच्यातर्फे 15 जून रोजी मलखांब दिवसाचे औचित्य साधून स्थानिक फरशी स्टॉप चौकात मलखांब प्रात्यक्षिक सादर करण्यात आले . यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष संजय तिरथकर,तर प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ मलखांब असोसिएशनचे अध्यक्ष सुनील पांडे , ,ज्येष्ठ पत्रकार सुरेश शुक्ल, मराठी विज्ञान परिषदेचे प्रवीण गुल्हाने, माजी नगरसेविका सौ. अंजली प्रमोद पांडे, कुस्तीगीर संघटनेचे दिलीप इटनकर, किशोर घरडे व नितीन गौरखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व हारअर्पण करण्यात आले. त्यानंतर मल्लखांब पटूंनी वेगवेगळी प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले .महाराष्ट्र हा खेळांचा प्रदेश आहे त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना मलखांब खेळाकडे वळवावे असे आवाहन विदर्भ मलखांब असोसिएशनचे अध्यक्ष सुनील पांडे यांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा मलखांब संघटनेचे सचिव विलास दलाल यांनी केले.संचालन अनुराधा पांडे आभारप्रदर्शन पंकज गाडे यांनी केले.

