९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन

मी एक स्त्री आहे म्हणून मला स्त्रीची वेदना जवळून कळते. आज मणिपूर येथे ज्वलंत परिस्थिती आहे. एका स्त्रीला निर्वस्त्र केल्यानंतर तिची सर्वांसमोर धिंड काढणे व तिच्या अंगावर अभद्रपणे स्पर्श करणे व सामूहिक बलात्कार करून तिला गोळी मारणे ही स्थिती किती भयानक आहे. त्या स्त्रीयांना त्याक्षणी काय वाटलं असेल तिची मानसिक आणि शारीरिक परीस्थिती काय असेल याबद्दल प्रत्येक स्त्री व पुरूष दोघांना तर संपूर्ण समाजाला विचार करणे आवश्यक आहे. मणिपूरची स्त्री, पुरुष, छोटे मुलं, या सर्वांची स्थिती भयानक आहे. तिथे सामाजिकता नष्ट झाली आहे. प्रत्येक व्यक्ती एकमेकांचा शत्रू झाला आहे. तिथे छोट्या मुलांना व पुरुषांना, स्त्रियांना मारून फेकणे सहज कृती झाली आहे, तिथे माणूसकी नाही, हैवानियत सुरू आहे हे फक्त यासाठी की तिथले लोक आपला गाव व जमीन सोडायला तयार नव्हते म्हणून हे सगळ घडत आहे असं म्हटलं जात आहे. यात सरकारची भूमिका त्या आदिवासी समाजासाठी नकारात्मकता दिसत आहे. असा माझा भारत देश नव्हता. ज्या जमिनीसाठी आमचे महापुरुष शहीद झाले आमचे भगवान बिरसा मुंडा, रबिंहुड तंट्या मामा भील, राघोजी भांगरे, विर बाबुराव शेडमाके, अश्या अनेक महापुरुषांनी या जल जंगल जमिनीसाठी संघर्ष केला. आज आपल्याला जे जमिनीचे अधिकार मिळाले या महापुरुषांमुळे आणि आज जल-जंगल जमिनीच्या अधिकारापासून आम्हाला वंचित केला जात आहे.
मणिपूर घटनेत आपण बघतो की एका माणसाची किंमत काहीच नाही. यात सरकारची भुमिका काय असली सरकार कोणाचीच होऊ शकत नाही. माणसाला माणूस न समजणारा त्यांच्यावर होणारा अत्याचार न बघू शकणारा आज लाज वाटत आहे की सरकारमध्ये या मनोवृत्तीचे लोकं आहेत. माणूस कोणत्या जातीचा आहे किंवा कोणत्या धर्माचा आहे हा नंतरचा भाग आहे. जेव्हा लहान असताना राष्ट्रगीत ऐकून देशप्रेमाची भावना जागृत व्हायची खूप छान वाटायचं, असं वाटत होतं की, आपण स्वातंत्र्याचा खरा आस्वाद घेत आहोत. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किती बलिदान आमच्या देशातल्या महापुरुषांनी दिले आहे. डॉ. बाबासाहेबांनी संविधानात समानतेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, संस्कृती रक्षणाचा अधिकार, जीवन जगण्याचा अधिकार, प्रत्येक अधिकार देऊन भारताला विविधतेत एकता प्रस्थापित केले त्यांचे स्वप्न म्हणजे या देशामध्ये प्रत्येक जाती-धर्म, वेशभूषा, संस्कृती सुरक्षित असली पाहिजे म्हणून धर्मनिरपेक्ष राष्ट्राची निर्मिती करण्यात आली. आज मणिपूर येथे लहान मुलांचे हात पाय कापून वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले आहे, रस्त्यावर मृतदेह पाहायला मिळतात. हे दृश्य प्रश्न चिन्ह निर्माण करते . हे दृश्य संपूर्ण भारतात पसरायला वेळ लागणार नाही. आज मणिपूर येथे घटना घडली, उद्या अजून कुठेही घडू शकते. एक मृतदेह जेव्हा आपल्या घरी असते तेव्हा आपल्याला कसं वाटते, तिथे संपूर्ण मणिपूर जळत आहे, तिथल्या लोकांना कसं वाटत असेल. त्याठिकाणी दोन जातीच भांडण आहे आणि हे सगळं घडलं हा मुद्दा दुसरा आहे. असं का घडलं हा पहिला मुद्दा आहे. आपल्या देशात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोकांना असं वाटतं की हा प्रकार माझ्यापर्यंत कधीच पोहचू शकत नाही, परंतु हे चुकीचं आहे. मला अनेक प्रश्न पडतात आपला समाज कधीच कोणाचा नुकसान करणारा किंवा याप्रकारे स्त्रीचा अपमान करणारा नव्हता. माझ्या समाजाला असं बनवणारा कोण हा महत्वाचा प्रश्न आहे. आत्ता तिथे खूप जास्त लोकं विस्थापित होत आहे, ते कुठं जाणार त्यांची रहाण्याची सोय कोण करणार त्यांना किती मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास सहन करावं लागेल अजून हे सांगता येत नाही. मणिपूर भारताचा राज्य नाही का? तिथल्या नागरिकांची व महिलांची सुरक्षितेची जबाबदारी सरकारची नाही का? मग या परिस्थितीमध्ये सरकारची भूमिका काय? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची. मग माझ्यासाठी लढणारा कोण, एका स्त्रीचा सन्मान सरकारला कळत नाही. हा तर आमचा खूप मोठा दुर्भाग्य आहे. आत्ता मला वाचवणारा एकच, तो म्हणजे माझा समाज, सर्वात मोठी शक्ती म्हणजे मी ज्या समाजात राहते. माझ्या समाजात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. सर्वात मोठा धर्म म्हणजे माणूसकी. माणूसकी या नात्याने आज आपल्याला, आपल्या समाजातील ज्यांच्यावर अत्याचार बलात्कार झाला. अशा लोकांसाठी न्याय मागायचा आहे. आपल्याला एक व्हायचे आहे. आत्ता फक्त समाजाची साथ आहे. कारण राजनितिक पक्ष फक्त आणि फक्त आपली पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व लोक आपली टीआरपी वाढवण्यासाठी धावपळ करत आहे. आपली खरी बाजू मांडणारे खूप कमी आहे म्हणून आपल्याला एक व्हायचे आहे. ९ ऑगस्ट ला जागतिक आदिवासी दिनानिमित्त यावर्षी मनोरंजन करण्याची वेळ नाही. हे समजून समोरचे पाऊल उचलणे गरजेचे आहे, नाही तर आपली येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही हे लक्षात ठेवा. आपले अस्तित्व संपावायचा प्रयत्न सुरू आहे…….
सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.|| जय आदिवासी ||

प्रा. अनिता संजय धुर्वे
चांदुर रेल्वे जि. अमरावती

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे