समन्वयाची दृष्टी ठेवत ग्राहक हितार्थ कार्यरत राहणे शिकावे -: डॉ. मोहन भागवत. अ भा ग्राहक पंचायत स्वर्णजयंती अधिवेशन हरियाणा

समन्वयाची दृष्टी ठेवत ग्राहक हितार्थ कार्यरत राहणे शिकावे -: डॉ. मोहन भागवत.
अ भा ग्राहक पंचायत स्वर्णजयंती अधिवेशन हरियाणा 

MB NEWS (ग्राहक मंच प्रसिद्ध प्रमुख ):-अ भा ग्राहक पंचायत स्वर्णजयंती अधिवेशन हरियाणा
-शोषणमुक्त समाजाची स्थापना करणे हे इप्सित  समोर ठेवून 1974  मध्ये स्थापन झालेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या स्थापनेच्या  पन्नासाव्या  वर्षी हरियाणातील समालखा येथे नुकतेच राष्ट्रीय स्तरावरील स्वर्णजयंती अधिवेशन अत्यंत थाटात व उत्साहात  सम्पन्न झाले.

  1. यासाठी विदर्भ प्रांतातून 51 जणांची चमू प्रांत अध्यक्ष डॉ नारायणराव मेहरे व  प्रांत सचिव नितीनजी काकडे यांच्या नेतृत्वात तिथे गेली होती. राष्ट्रीय कार्यकरिणी सदस्य अधिवक्ता स्मिताताई देशपांडे व गजाननराव पांडे याचे विशेष मार्गदर्शन लाभले.यात अमरावतीहून प्रांत संघटन मंत्री  डॉ. अजय गाडे, जिल्हा संघटन मंत्री  अशोक हांडे, डॉ चंदनसिंह राजपूत, डॉ. शोभाताई गायकवाड,अधिवक्ता स्मिताताई बुल, आशाताई दाभाडे,प्राचार्या प्रीतीताई  बैतुले व चारुदत्त चौधरी अशा आठ जणांचा विशेष सहभाग होता.चक दे इंडिया ज्यांच्या जीवनावर आधारित आहे ते हॉकीपटू मीर रंजन नेगी हे ग्राहक पंचायतीशी जुळलेले पाहताना अभिमान वाटला.
    अधिवेशनाच्या उद्घाटनाला  रंगीबेरंगी पैठणी नेसून उत्साहात न्हाऊन निघालेल्या भगिनी होत्या.कुर्ता पायजमा, जाकीट ,तसेच आपापल्या प्रांतातील वेशभूषा असणाऱ्या  कार्यकर्त्यांनी संघटनेचे देशव्यापी  मनोहारी स्वरूप समोर ठेवले होते.
    उद्घाटनाला सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे अत्यन्त समृध्द पाथेय लाभल्याने ग्राहक चळवळीच्या कार्याचा देशव्यापी प्रचंड मोठा आवाका प्रत्येकाला कळला व कार्याची सुयोग्य  दिशासुद्धा  प्रत्येकाला गवसली.ग्रहण करतो तो ग्राहक अशी व्याख्या स्पष्ट करित मोहनजी म्हणाले की विक्रेतासुद्धा ग्राहक असतो.कुठल्याही पातळीवर ग्राहकांचे शोषण होणार नाही यासाठी कर्तव्य म्हणून ग्राहक पंचायतीला लढावेच लागेल.त्यासाठी ग्राहक प्रबोधन,समन्वय , अनुशासन व सिंहावलोकन यांचे महत्त्व त्यांनी विशद केले.दैदिप्यमान भारतीय संस्कृतीचा आदरपूर्वक उल्लेख करत ते पुढे म्हणाले की किती कमावले यापेक्षा किती वाटले हे महत्वाचे मानणारी आपली संस्कृती आहे. तसेच किती जगलो यापेक्षा कसे जगलो यावर जीवनाचे सार्थक अवलंबून असते.सगळ्यांनी सन्मार्गपथ अनुसरावा यासाठी एकदिलाने एकदिशेने ग्राहक हितासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
    ग्राहक जागृतीसाठी दोन पुस्तकांचे विमोचन व विविध सेवा देणाऱ्या ग्राहक ऍप चा शुभारंभ देखील याठिकाणी झाला.
    इंडिया 24 या वृत्तवाहिनीवरील लोकप्रिय निवेदिका रुबिका लियाकत यांनी आपल्या अभ्यासपूर्ण सत्रात उपभोक्तावादाच्या विळख्यात सापडलेल्या ग्राहक राजाला पदोपदी जागृत करण्याच्या गरजेवर विशेष भर दिला.ग्राहक पंचायत करीत असलेले ऐतिहासिक कार्य महत्वपूर्ण असून ग्राहकांची मानसिकता बदलवून त्याला विनाकारण अधिकाधिक वस्तू खरेदी करण्यास प्रवृत्त करणाऱ्या जाहिरातींना कोणी  फसू नये तसेच आपला परिवार एकसंघ व मजबूत रहावा यासाठी प्रत्येकाने परिवारातल्या इतर सदस्यांना मौलिक वेळ देणे अत्यन्त गरजेचे आहे असे भावनापूर्ण व कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
    अखिल भारतीय पर्यावरण प्रमुख गोपालजी आर्या यांनी आपल्या अर्थगर्भ विवेचनात स्पष्ट  केले की आपली महान संस्कृती ही वेदकाळापासुनच  निसर्गाची निस्सीम उपासक असून पर्यावरणाला नितांत महत्व देणारी आहे.विविध समर्पक उदाहरणे देत त्यांनी वीज,पाणी,केमिकल्स ,प्लास्टिक यांच्या अतिरेकी वापराला  आळा घालण्याच्या आवश्यकतेवर   भर दिला व त्यासाठी घराघरात सहज शक्य असणाऱ्या अनेक उपाययोजना सांगुन उपस्थितांना वैचारिकदृष्ट्या समृद्ध केले.
    अटलबिहारी वाजपेयी विद्यापीठ, विलासपूरचे कुलपती  प्रा. ए. डी. एन.  बाजपेयी यांनी सुमंगलम अर्थव्यवस्था व ग्राहक संतुष्टी या विषयावरील आपल्या धाराप्रवाही भाषणात विविध आर्थिक मॉडेल्सची सांगोपांग चर्चा करून सिद्ध केले की चार पुरुषार्थ असणारे भारतीय मॉडेलच सर्वश्रेष्ठ आहे.प्रगतीचा सोपान चढताना आपल्याला स्वदेशी व पर्यावरण यांचाही विचार करायलाच हवा.
    राष्ट्रीय मानवाधिकार कमिशनचे अध्यक्ष न्यायमूर्ती अरुणकुमार मिश्रा यांनी आपल्या  मानवाधिकारांच्या संदर्भात उपभोक्ता अधिकार व खाद्य सुरक्षा अधिनियम या विषयांवर बोलताना ग्राहकोपयोगी अनेक तरतुदींवर अभ्यासपूर्ण भाष्य केले.

याशिवाय श्रीमती पल्लवी पिंगे व समूह,चंदिगड यांचे स्वत्रयी व पंचप्रण या विषयावर अत्यन्त दर्जेदार नृत्य तसेच अन्य कलाकारांचे नाट्य,नृत्य ,बासरीवादन अशा एकापेक्षा एक सरस   सांस्कृतिक कार्यक्रमांनी अधिवेशनाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते व सर्व रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.
ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शहा  व स्वर्णजयंती समारोहाचे अध्यक्ष अशोकजी पांडे यांच्या कठोर परिश्रमातून साकार झालेले आणि  ग्राहक राजाच्या हितार्थ ज्ञानसम्पन्न, अनुभवसंपन्न करणारे  व  भविष्याचा वेध घेण्यासाठी कृतीशीलतेवर भर देणारे हे अधिवेशन चिरकाल स्मरणात राहील हे नक्की. पुढील राष्ट्रीय अधिवेशनात   मार्चमध्ये बडोदा येथे नव उन्मेष ,नवऊर्जा घेऊन परत भेटण्याची  मनात पक्की खूणगाठ बांधली गेली आणि वैचारिक, सांस्कृतिक पाथेय  मनाच्या मखमली पेटीत सांभाळण्यासाठी देत  स्वर्णजयंती अधिवेशनाची सांगता झाली.

अशोक हांडे
चारुदत्त चौधरी
अमरावती

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे