तळेगाव ठाकूरची रेणुका देवी जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध
“मंदिराला पुरातन इतिहास
७०० ते ८०० वर्ष पुरातन मंदिर
जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारे रेणुका देवी
MB NEWS (सुनिल घोरमाडे )तळेगाव ठाकूर :-
तळेगाव ठाकूर येठे रविवारपासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री रेणुका देवी मंदिर परिसर उजळून निघाला आहे . शारदीय नवरात्रीनिमित्त तळेगाव ठाकूर येथील रेणुका देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सव थाटामाटात सुरू झाली आहे येथील रेणुका देवीच्या या मंदिराला ७०० ते ८०० वर्षाची ऐतिहासिक परंपरा असल्याचे सांगितले जाते. रेणुका देवीला अंबाबाई, जगदंबा, महामाया विश्वव्यापी माता, अशाप्रकारे बिरूद भक्तांच्या वतीने देण्यात येते .हि रेणुका भक्तांच्या नवसाला पावणारी आहेअशी सर्वदूर ख्याती आहे. राष्ट्रीय महामार्ग अमरावती नागपूर महामार्गावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी स्थळ मोझरी पासून अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या तळेगाव ठाकूर या गावी नवसाला पावणारी आदिशक्ती आई रेणुका देवीचे मंदिर स्थित आहे. पंचक्रोशीतील आई रेणुका देवीचे जागृत आणि प्रसिद्ध असे पुरातन मंदिर असल्याचे दिसून येते .या मंदिराची ओळख फार पुरातन अशा स्वरूपाची आहे. मंदिरातील रेणुका देवीचा इतिहास पाहता देवीचे जागृत स्थान असल्याचे आपल्या निदर्शनात येते तळेगाव ठाकूर येथील महामाया रेणुका नवसाला पावणारी आहे अशी ख्याती या मंदिराची असल्याने या ठिकाणी भक्तमंडळी दुरदुरून दर्शनाला गर्दी करीत असतात. अमरावती जिल्ह्यातील मुख्य अशा अध्यात्मिक आणि पुरातन मंदिरांपैकी एक तळेगाव ठाकूर येथील रेणुका देवीचे मंदिर आहे. पूर्वाभिमुख असणारे रेणुका देवीचे मंदिर हे दिवसेंदिवस नावारूपास येत आहे. आणि देवीचे स्वरूप अतिशय वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळे मनाला भुरळ पडल्याशिवाय राहत नाही . तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर परिसरातील रेणुका देवी ही साक्षात असून ती आजही तीन रूपांमध्ये दिसत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. श्री रेणुका देवी संस्थान मंदिर एक जागृत देवस्थान असून साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ व अनेकांची कुलदेवता आहे. श्री रेणुका देवी संस्थान मंदिर हे एक जागृत देवस्थान असून या ठिकाणी देवीच्या मंदिराचा मनमोहक असा परिसर आहे. अमरावती वरून साधारणतः४० किलोमीटर अंतरावर तळेगाव ठाकूर हे गाव असून मुख्य रस्त्यावरून दीड किलोमीटर अंतरावर अतिशय सुंदर परिसरातील मंदिर विराजमान आहे. याच ठिकाणी हरिहर मंदिर ,महादेव मंदिर,जगदीश महाराज मंदिर, हनुमान मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल रुक्माई मंदिर, श्रीराम मंदिर, डोंगर पुरी महाराज मंदिर ,अशा मंदिरांचा पसारा फुललेला आहे.
नवसाला पावणारी रेणुका माता मंदिराचा इतिहास ७०० ते ८०० वर्षे पुरातन स्वरूपाचा असल्याने या मंदिरातील मूर्ती बद्दलची एक आख्यायिका सांगितली जाते. मंदिराचा इतिहास पाहता असे लक्षात येते की ते मंदिर बरेच वर्षापासून या ठिकाणी स्थित आहे. याबद्दल असे बोलले जाते की या ठिकाणी वास्तव्यात असलेले भारती कुटुंबातील लोक दरवर्षी माहूरगडावर दर्शनासाठी जात असत असेच एकदा माहूरगडावर दर्शनाकरिता गेले असता येथील तळ्यामध्ये आंघोळीला गेलेल्या परिवारातील एक म्हातारी त्या तळ्यात बुडली तेव्हा ती परत आली नाही कुटुंबातील व्यक्तींनी तिचा बराच शोध घेतला पण ती म्हातारी मिळाली नाही शेवटी मातृतीर्थावर जाऊन दर्शन घ्यावे आणि घरी निघून जावे या उद्देशाने जेव्हा सर्व मंडळी दर्शनासाठी त्यात मातृ तीर्थावर गेली तेव्हा तळ्याजवळ गेले असत्या त्या तळ्यामधून ती बुडालेली म्हातारी उदो उदो असा जयघोष करत बाहेर आली
त्यावेळी तिच्या गळ्यात कवड्याची माळ ,हातात पितळीची तबकडी, आणि त्यात तबकडीमध्ये सुपारीच्या आकाराची रेणुका देवीची मूर्ती होती तिने दत्ताच्या सानिध्यात आणि पिंगळाई नदीच्या तीरावर माझी विधियुक्त प्राणप्रतिष्ठा स्थापना करावी असा निर्देश दिला. आणि ती पुन्हा म्हातारी अदृश्य झाली तिने सांगितलेल्या निर्देशानुसार रेणुका देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सदर परिसरातील तळेगाव ठाकूर येथे करण्यात आली तेव्हापासून या ठिकाणी देवीची आराधना नवरात्र उत्सव भजन ,जागर अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. तळेगाव ठेपुर येथे अनेक मंदिरांचा संगम आहे आणि या मंदिरामध्ये अनेक जागृत देवस्थानांची मालिका आहे मंदिरातील रेणुका देवीच्या मूर्तीची वाढ ही कणाकणाने होत जाऊन आज सहाशे आठशे वर्षे पूर्ण झाल्यानंतर या मंदिरातील मूर्तीचे रूपांतर भव्य स्वरूप धारण करण्यात झाले आहे त्यामुळेच तिचे पूर्वाभिमुख स्वरूप पाहण्यासाठी आज या ठिकाणी दूर दुरून भक्त मंडळी गर्दी करत असताना दिसून येते त्याचबरोबर या मंदिरातील देवीचे स्वरूप हे अतिशय लोभस असल्याने तसेच ही रेणुका माता भक्तांच्या नवसाला धावून येते अशी श्रद्धा सर्व दूर असल्यामुळे परिसरातच नाही तर दुर दुरून या ठिकाणी भक्त मंडळी येत राहतात.
आज देवीच्या मंदिराची संपूर्ण जबाबदारी मंदिराचे सेवक श्री अशोक देविदास पंत भारती महाराज यांच्याकडे असून त्यांच्या हाताखाली संपूर्ण मंदिराचा जिर्णोद्धार होत आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांना देवीचे महात्म्य आणि देवीचे माहिती समजावून देण्याचे काम गावातील मंडळी तसेच मंदिरातील मंडळी अतिशय सुंदरतेने पटवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करीत आहे .नवरात्र काळात या ठिकाणी भक्तांची दर्शनाची रीग लागलेली असते आणि नवसाला पावणारी ही रेणुका माता असल्याचे संपूर्ण परिसरात ख्याती असल्याने भक्त मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात नवरात्र काळात या ठिकाणी भक्ती आणि श्रद्धेचे महत्त्व आल्यासारखे वाटते.नवरात्र उत्सवात हा परिसर भक्ती आणि शक्ती चा दुहेरी रंगात न्हाऊन निघत दिसून येतो

