मौन धारण करून अमरावतीमध्ये बाबासाहेबांना अभिवादन..
MB -NEWS (महाराष्ट्राची बातमीपत्र)अमरावती :- मुळात भगवा रंग हा त्यागाचे प्रतिक आहे, सगळ्यांना सामावून घेणारा हा रंग आहे, हा रंग धारण करणारी व्यक्ती स्वतःकडे काहीही ठेवत नाही. तर दुसरीकडे सध्या भगवा वस्त्र परिधान करून काही बाबा लोकं तलवारी काढण्याची भाषा करत आहेत. ज्यांना भगव्या आणि निळ्या रंगाचं महत्त्व समजलं आहे, ती लोकं कधीच या देशाचं विभाजन करणार नाहीत किंवा समाजात भांडणं लावणार नाहीत, असं मत अमरावतीच्या माजी पालकमंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं.
अमरावती जिल्हा ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन यात्रेत ॲड. यशोमती ठाकूर बोलत होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉ. कन्हैयाकुमार, ज्येष्ठ विचारवंत कैलास कामोद, अमरावती जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष अनिरूद्ध देशमुख, माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार विरेंद्र जगताप, अमरावती शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलु शेखावत, अमरावतीचे माजी महापौर विलास इंगोले, अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष कांचनमाला गावडे, शहर अध्यक्ष महिला काँग्रेस डॉ. अंजली ठाकरे, प्रदेश प्रवक्ते, दिलीप एडतकर, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, प्रदेश सचिव हरिभाऊ मोहोड, बाजार समितीचे सभापती हरिश मोरे, जि.प. माजी बांधकाम सभापती जयंतराव देशमुख, एससी सेल चे जिल्हाध्यक्ष प्रविण मनोहर, सेवादलाचे प्रदिप देशमुख, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय नागोने, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस पंकज मोरे, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग मुक्कदर खान-पठाण, नया अकोलाच्या सरपंच सुजाता तिडके रामेश्वर अभ्यंकर उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांची अमरावती ही भूमी आहे. त्यामुळेच आजही अमरावतीमध्ये पुरोगामी विचार जिवंत असल्याचं ॲड. यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी जे केलंय, त्याच स्मरण आपण सतत केलं पाहिजे. तसं केलं नाही तर सत्ताधारी आपल्याला नेस्तनाबूत करतील, संविधानाची मोडतोड करतील. एवढचं काय तर देशाचा नकाशाही बदलतील, अशी भीतीही ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी नया अकोला इथं ठेवण्यात आल्या. या अस्थी म्हणजे प्रेरणेचं स्त्रोत आहेत. ही ऊर्जाभूमी आहे, इथूनच आपल्याला श्रद्धेची प्रेरणा मिळत असल्याचं त्या म्हणाल्या. मागील साधारणतः एका दशकात काही लोकांनी देशाची परिस्थिती खराब केली आहे. समतेचा विचार संपविण्याचा डाव काही जणांचा आहे. त्यामुळं अशा विचारपीठांवरील मार्गदर्शन नव्या पिढीला सांगा असं आवाहनही ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी केलं.
भगवा वस्त्र घातलेला एक बाबा तलवारी काढण्याची भाषा करतो. अशा परिस्थितीत आपण त्यामागचा डाव ओळखला पाहिजे. मूळात भगवा रंग हा त्यागाचं प्रतिक आहे. सगळ्यांना सामावून घेणारा भगवा रंग आहे. भगवा रंग धारण करणारी व्यक्ती स्वतःकडे काहीही ठेवत नाही. अशाप्रकारे भगव्या रंगाचं महत्त्व त्यांनी यावेळी सांगितलं. भगवान गौतम बुद्ध यांनी धारण केलेला भगवा रंग हा शांतीचा संदेश देणार आहे. तसंच निळ्या रंगाचंही महत्त्व आहे. निळा रंग हा शांतता, समानतेचा संदेश देतो. म्हणूनच भगवा आणि निळा या दोन्ही रंगाचे अर्थ ज्यांना समजले ते कधीच या देशाचं विभाजन किंवा समाजात भांडणं लावणार नाहीत, असंही त्या यावेळी म्हणाल्या.
मौन श्रद्धांजली:-काँग्रेसच्या अमरावती शहर व ग्रामीण जिल्हा कमिटीच्या वतीनं आयोजित अभिवादन सभेत दोन मिनिटांचं मौन ठेवत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. यावर्षीपासूनच मौन श्रद्धांजली वाहण्यास सुरूवात करण्यात आली असून दरवर्षी अशाचं पद्धतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येईल, अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली.
यशोमती ठाकूर आणि कन्हैयाकुमार माझ्या आशेचा किरण – रावसाहेब कसबे
मी ८० वर्षांचा असून मी सध्या ज्या आशेच्या दोन किरणांवर जगतोय त्यातलं पहिलं नाव हे यशोमती ठाकूर आणि दुसरं नाव हे कन्हैयाकुमार यांचं आहे. या दोघांनाही मी कधीच हारतांना पाहणार नाही. कारण त्यांचा वैचारिक पाया अतिशय भक्कम आहे, त्यामुळं त्यांची हार कधीच होणार नाही, असं मत ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं सगळ्या जाती-धर्मांच्या लोकांना यशोमती ठाकूर यांनी एकत्र आणलं. हा सामाजिक परिवर्तनाचा अनुकरणीय प्रयोग सगळ्या देशभरात करण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. हे दोघंही आमच्यासारख्यांच्या खांद्यावर उभे आहेत. त्यामुळं त्यांना आमच्यापेक्षा दूरचं दिसत असल्याचं सांगत यशोमती ठाकूर आणि कन्हैयकुमार यांच्यारूपानं देशात पुरोगामीत्वाची लढाई लढणारे दोन योद्धे योग्य दिशेने मार्गक्रमण करत असल्याचं ते म्हणाले.
सध्या सत्तेसाठी भगवी वस्त्र परिधान केली जात आहेत – कन्हैयाकुमार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच विजय असो अशी मराठीत घोषणा देत कन्हैयाकुमार यांनी भाषणाची सुरूवात केली. केवळ १४ एप्रिल आणि ६ डिसेंबरलाच डॉ. आंबेडकर यांचं स्मरण करून चालणार नाही. त्यांच्या वैचारिक मार्गावर चाललो तर अनेक समस्यांचं समाधान होईल. आधी दलित आपली जात लपवत होते. आता खासदार होण्यासाठी दलित असल्याचं सांगतात, त्यासाठी अनुसूचित जातीचं खोटं प्रमाणपत्र सादर करतात, अशी टीकाही कन्हैयाकुमार यांनी यावेळी केली. महाराष्ट्रात जर महापुरूष जन्मले नसते तर ही पुरोगामी भूमी झाली नसती. सामान्य माणसाला त्याचे अधिकार मिळवून देण्यासाठी इथं असामान्य माणूस जन्मतो. त्यामुळं त्या असामान्य महापुरूषांनी आपल्याला दिलेले अधिकार सुरक्षित राहण्यासाठी केवळ या दोन दिवशीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करून चालणार नाही, तर वर्षभर चोवीस तास त्यांच्या वैचारिक मार्गावरच आपल्याला चालण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
करो तैयारी राजतिलक की, आ रहे है भगवाधारी, अशा घोषणा सध्या दिल्या जात आहेत. भगवान गौतम बुद्धांच्या चिवराचा रंग भगवा, भारताच्या तिरंग्यात आणि काँग्रेसच्या झेंड्य़ातही भगवा रंग आहे. आम्हाला भगव्या रंगाची अडचण नाही तर भगेड्यांची आहे. भगवान गौतम बुद्धांनी समाजासाठी राजपाट सोडला आणि भगवी वस्त्र धारण केली. सध्या तर राजपाट मिळवण्यासाठी भगवी वस्त्र परिधान केली जात आहेत. अचानकच या लोकांच्या मनात भगव्या रंगाविषयी प्रेण निर्माण झालं त्यामागे सत्ताकारण असल्याचं कन्हैयाकुमार यांनी सांगितलं.

