नायगाव, वरुड बगाजी येथील वीजपुरवठा २४ तासांच्या आत सुरळीत,मंगरूळ दस्तगीर येथील महावितरण कार्यालयाची कामगिरी
२५ ते ३० विद्युत खांब कोसळून ठिकठिकाणी तुटले होते तार
सहाय्यक अभियंता अख्तर खान यांच्या नेतृत्वात केले कार्य
धामणगाव रेल्वे – (ता. प्र.):-धामणगाव रेल्वे तालुक्यातील नायगाव व वरुड बगाजी या परिसरात २० एप्रिला रात्री आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे या परिसरातील २५ ते ३० विद्युत खांब कोसळून ठिकठिकाणी तार तुटले होते. अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली असतांना मंगरूळ दस्तगीर येथील महावितरण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी उपकार्यकारी अभियंता श्री. राहूल उमरे यांच्या मार्गदर्शनात व मंगरूळ दस्तगिरचे इंचार्ज सहाय्यक अभियंता अख्तर अजीज खान यांच्या नेतृत्वात सतत काम करून केवळ २४ तासांच्या विद्युत पुरवठा सुरळीत केल्याची कामगिरी केली.
शनिवारी २० एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान जोरदार वादळ उठले. चक्रीवादळासमान असलेल्या या भयंकर वादळाने मंगरूळ दस्तगीर मंडळातील पाच गावात प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आधी वादळ व नंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाल्याने टीनपत्रे उडाली, तर अनेक घराची पडझड झाली आहे. बऱ्याच ठिकाणी वीजवाहिन्यांसह विद्युत खांब पडल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. नायगाव गावात अनेक लघुदाब १० – १५ वाहिनीचे विद्युत पोल पडले होते. तर वरूड बगाजी येथे सुध्दा ८ – १० विद्युत पोल पडले होते. याशिवाय ७ – ८ डीटीसीचे स्ट्रक्चर झूकले होते व अनेक ठिकाणी वीज तारा सुध्दा तुटून पडल्या. गावातील परिस्थिती लक्षात घेता २१ एप्रिलला सकाळी ७ पासून ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत दोन्ही गावातील वीज पुरवठा सुरळीत केला. यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता अख्तर खान यांच्या नेतृत्वात इलेक्ट्रीकल कंत्राटदार ची संपूर्ण टीम, लाईनमन धीरज पांडे, वरिष्ठ तंत्रज्ञ शशिकांत मते, विशाल मेश्राम, उमेश कांबळे, अंकुश पिसे, कंत्राटी कामगार स्वप्निल झोपाटे, रुपेश निचत, विशेष सहकार्य मनवर मडावी , बबनराव तिजारे , विजयराव नागापूरे,शेख रफीक शेख सुबहान आदींनी रात्रंदिवस काम करून कोसळलेले विद्युत पोल पूर्ववत उभे केले व सर्व तारा जोडल्या. अशी परिस्थिती झाली असतांना देखील केवळ २४ तासांच्या आत रविवारी सायंकाळी ५ वाजता विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.

