अमरावती लोकसभा मतदार संघात राणांचा हिशोब चुकता होणार,मोदी सरकार नव्हे आम्हाला भारत सरकार हवे-उद्धव ठाकरे
*चूक दुरुस्त करण्याची संधी*- शरदचंद्र पवार
*विराट सभेत बळवंत वानखडे यांच्या विजयाचा संकल्प*
महाराष्ट्रातील बातमीपत्र (अमरावती) :-शेतकऱ्यांना उपाशी ठेवणारे, महिलांचा अपमान करणारे, युवकांना बेरोजगार करणारे,दहा वर्षात देश लुटून कंगाल करणारे हुकूमशहा मोदी सरकार आपल्याला हाणून पाडायचे आहे आणि संविधानावर चालणारे महाविकास आघाडीचे भारत सरकार आपल्याला निवडून आणायचे आहे.लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी ही लढाई आहे. समाजातील प्रत्येक घटकाला असमाधानी करणाऱ्या मोदी सरकारविरुद्ध देशात असंतोषाची मोठी लाट निर्माण झाली आहे या संधीचा फायदा घेऊन प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमेच्या बळवंत वानखडेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या अशी कळकळीची विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली व नवनीत राणांचा हिशोब चुकता करा असा आदेश त्यांनी उपस्थित सळसळत्या शिवसैनिकांना दिला.
अमरावती लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत बसवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आज संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी उद्धव ठाकरे सभेला संबोधित करत होते. सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार, काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनीक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आ. यशोमती ठाकूर, उमेदवार बळवंत वानखडे, नितेश कराळे,माजी खा.अनंत गुढे,डॉ. सुनील देशमुख, शिवसेना नेत्या प्रीती बंड,सुधीर सूर्यवंशी,प्रा.डॉ.हेमंत देशमुख,प्रदीप राऊत,सुनील खराटे,यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, ही निवडणूक शेतकऱ्यांच्या जीवनमरणाची लढाई आहे. खतांवर१८ टक्के जीएसटी लावून देशाला लुटणारे मोदी सरकार संविधान बदलविण्याचा डाव आखत आहे. मोदींना महाराष्ट्राबद्दल आकस आहे, दहा वर्षात देशाला कंगाल करणारे मोदी सरकार नको आम्हाला भारत सरकार पाहिजे.शेतकऱ्यांची मुले आत्महत्या करीत आहे, मणिपूर सारख्या घटना घडल्यानंतरही मुनगंटीवार सारखा सांस्कृतिक मंत्री बहीण भावाच्या नात्याबद्दल अभद्र बोलतोय अश्याबद्दल चिक्कार शब्द न काढता भाजपा मूग गिळून बसले आहे. दहा वर्षात कवडीचे योगदान न देणारे हे सरकार गद्दारांनाच पाठबळ देऊ शकते.भ्रम, थापड्यांची लंका म्हणजेच भाजप होय असा आरोप सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.दरम्यान त्यांनी हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर नवनीत राणांचा पराभव करण्यासाठी चांगले वातावरण निर्माण केल्याबद्दल अमरावतीकरांना धन्यवाद देत या नौटंकीबाजांना पराभूत करून बदला घेण्याचे आवाहन शिवसैनिकांसह महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना केले.
तत्पूर्वी बोलताना काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक म्हणाले की नरेंद्र मोदी जर देशात पुन्हा निवडून आले तर निवडणुका होणार नाहीत.त्यामुळे हुकूमशाही टाळण्यासाठी बळवंत वानखडे यांच्या रूपाने खासदार संसदेत गेला तर प्रत्येक अमरावती कराचा अभिमान निश्चित वाढेल.असेही ते म्हणाले. तर माजी खासदार अनंत गुढे यांनी पोलिसांच्या गराड्यात राहणाऱ्या खासदाराचा सामान्यांना काय उपयोग असा सवाल यावेळी बोलताना उपस्थित केला. अशा मुजोर आणि नौटंकीबाज खासदाराची अमरावतीला गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. तर यावेळी बोलताना काँग्रेसच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की बळवंत वानखडे या आमदारांनी एकही प्रश्न उपस्थित केला नाही. वास्तविक बळवंत वानखडे यांच्या संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी ही भान बाळगायला पाहिजे. बळवंत वानखडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सरकारने कधी न्याय दिला? पालकमंत्र्यांनी एक तरी डीपीडीसी मिटिंग घेतली का? असे सवाल ॲड.ठाकूर यांनी यावेळी उपस्थित केले. या सभेला अमरावती जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहामध्ये कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना बसण्यासाठी जागा न मिळाल्याने बाहेर लावलेल्या स्क्रीन समोर शेकडो कार्यकर्त्यांनी उभे राहून या जाहीर सभेला उपस्थिती दर्शवली.
चौकट
*चूक दुरुस्त करण्याची वेळ*- शरद पवार
मागील निवडणुकीत मी आपल्याला चुकीच्या माणसासाठी मतदान करण्याची विनंती केली होती. त्यांना आपण निवडून आणले होते परंतु ती माझी मोठी चूक होती.आता चूक दुरुस्त करण्याचीवेळ आली असून बाप बदलणाऱ्यांना घरी बसविण्याची चांगली संधी आली आहे. यावेळी स्वच्छ प्रतिमेच्या बळवंत वानखडेंना विजयी करण्याची विनंती शरद पवार यांनी केली.सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे. यामध्ये शिवसैनिक पुढे आहेत याबद्दल उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त करून शरद पवार यांनी खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी सर्वांनीच एकत्र येण्याचे आवाहन केले. ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. हा देश राज्यघटनेमुळे एकसंघ राहिला या राज्यघटनेला कुणीही धक्का लावू नये त्याकरिता मोठ्या प्रमाणात मतदान करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले.

