भावी डॉक्टर युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
MB NEWS ( सुनिल घोरमाडे) तिवसा :- येथील श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या एका २३ वर्षीय भावी डॉक्टर युवतीने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री ७.३० वाजता उघडकीस आली.
संस्कृती महेंद्र वानखेडे (वय २३, रा. नांदेड) असे मृतक युवतीचे नाव आहे. ती गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत होती. सध्या ती वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून इंटर्नशिप करत होती. काही दिवसांतच तिला इंटर्नशिप पूर्ण केल्याचा दाखला मिळणार तोच अचानक तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गुरुदेवनगर येथील गुडघे यांच्याकडे ती भाड्याने राहत होती. तिने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस येताच वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संस्कृती वानखेडे या भावी डॉक्टर युवतीने आत्महत्या का केली असावी, याबाबतचे कारण मात्र समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, पुढील तपास तिवसा पोलिस स्टेशन करीत आहे.

