आसाम रायफल अंतर्गत करिअरच्या संधीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
MB-NEWS प्रतिनिधी (चांदुर रेल्वे )- स्थानिक राजर्षी शाहू सायन्स कॉलेज चांदुररेल्वे येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील आणि करिअर कट्टा उपक्रमातील नोंदणीकृत विद्यार्थ्यांकरिता आसाम रायफल अंतर्गत करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.या सत्राला महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी गौरव भस्मे यांनी मार्गदर्शन केले.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने स्वावलंबी होण्याकरिता स्वतःहून घेतलेल्या कष्टातून आणि महाविद्यालयातील मार्गदर्शनातून आसाम रायफल सारख्या क्षेत्रात कामगिरी करणे अभिमानास्पद बाब आहे.आजच्या तरुणाने देशाच्या संरक्षणाकरिता तत्पर असणे खरच कौतुकाची बाजू आहे आणि त्याहूनही अभिमानाची बाब म्हणजे करिअर घडविल्यानंतर आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे कारण हे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांकरिता प्रेरणा असतात.आज रोजी गौरव भस्मे यांनी आसाम रायफल अंतर्गत देशाच्या संरक्षणाकरिता देत असलेली सेवा महाविद्यालयाकरिता अभिमानास्पद बाब आहे.आपल्या मार्गदर्शनात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन आनंद तर घ्यावाच परंतु अनावश्यक गोष्टींकरिता आपला अमूल्य वेळ खर्ची न घालता करिअर कडे गंभीरतेने बघण्याचे महत्वाचे असल्याचे त्याने कडकडाडून सांगितले. विविध वयोगटाकरीता असणाऱ्या नोकरीच्या संधी आणि त्याकरिता आवश्यक तयारी याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.विद्यार्थ्यांकडून सुद्धा प्रश्नांची विचारणा झाली अतिशय दुतर्फा संवाद या उपक्रमादरम्यान बघायला मिळाला.
या मार्गदर्शन कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.वडनेरकर उपस्थित असून त्यांनी सुद्धा अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांवर होणारा सकारात्मक परिणाम यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील करिअर कट्टा उपक्रमाच्या समन्वयक प्रा.ममता पळसपगार आणि जिल्हा नियोजन समिती यांनी केले.

